कुल पेज दृश्य

शनिवार, 29 जून 2013

.चित्रगुप्ताची चोपडी प्रा.य.ना.वालावलकर

.....................चित्रगुप्ताची चोपडी
प्रा..ना.वालावलकर ynwala@gmail.com
त्र्यंबकेश्वरीं कालसर्पयोगाचे नारायण-नागबळी विधी करणारे तोता भट आसन्नमरणावस्थेत होते, ते निधन पावले. पापपुण्याची झाडाझडती देण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे राहिले. चित्रगुप्त म्हणाला,"माझ्या वहीतील नोंदींप्रमाणे दिसते की तू नागबळी नावाचा विधी करायला भाग पाडून एक हजार नऊशे एकसष्ठ जणांना लुबाडण्याचे मुख्य पाप केले आहेस.म्हणून तुला तेव्हढे दिवस नरकवास भोगावा लागेल. अन्य लहान सहान पापे आहेतच."
"मी हे सगळे धर्मशास्त्रानुसार केले.ते पाप कसे असेल?"
"माझ्यासमोर खोटे बोलायचे नाही.मी चित्रगुप्त आहे.त्र्यंबकेश्वराला आलेले तुझे भोळसट, श्रद्धाळू गिर्‍हाईक नव्हे. कुंडलीतील राहू-केतू बिंदू जोडणार्‍या सरळ रेषेच्या एका बाजूला सगळे ग्रह पडले म्हणजे कालसर्पयोग होतो. तो त्या व्यक्तीला घातक असतो. असे तुम्ही सांगता ते श्रुति-स्मृति-पुरा्णोक्त आहे काय ? कुंडली तरी कोणत्या धर्मशास्त्रात आहे काय ? सांग पाहू. श्रद्धाळूंना फसवण्यासाठी तुम्हीच निर्माण केलेली ही सगळी बनवाबनवी आहे.त्यासाठी शास्त्राधार मुळीच नाही"
"पण मी तिरुपती बालाजी,अष्टविनायक,आदि अनेक तीर्थयात्रा केल्या आहेत. काशीला जाऊन पर्वकाळी शुभमुहूर्तावर गंगास्नान केले आहे.सत्यनारायणव्रत तर प्रतिवर्षी करत होतो. त्यामुळे शास्त्रवचनांनुसार माझ्या पापांचे क्षालन झाले असेलच."
"हे सगळे तुमच्या मनाच्या समजुतीसाठी. खोटेनाटे सांगून लोकांना फसवल्याचे मनात खात असते ना! त्यातून थोडी सुटका मिळवण्यासाठी करावयाचे हे भ्रामक उपाय आहेत.इकडे कर्मफलसिद्धान्त सांगायचा आणि तिकडे पापक्षालनाचे उपाय करायचे.काय ही विसंगती! किती ही आत्मवंचना !! तू अनेक गरिबांनासुद्धा लुबाडले आहेस.या पापातून सुटका नाही.नरकवास भोगावाच लागेल."
"पण तो चुकवण्याचा काहीतरी मार्ग असेलच ना?" तोता भट म्हणाला.
"तो निरर्थक,निरुपयोगी नागबळी विधी अनेकांना करायला लावून तू खूप संपत्ती गोळा केली आहेस.त्या सगळ्याची नोंद माझ्या चोपडीत आहे.पण तो पैसा राहिला घरी.इथे त्याचा काही उपयोग नाही.नियमाप्रमाणे नरकात जाणे अटळ आहे."
"या नरकवासाचे स्वरूप काय असते?"
" आता आलास सरळ! पाप केले आहेस हे पटले ना? या पापासाठी सर्पनरकभोग आहे.एका मोठ्या हौदात खूप साप ठेवले आहेत.तिथे तुला एकहजार नऊशे एकसष्ट दिवस कंठावे लागतील.ते गार गिळगिळीत साप तुझ्या अंगावर सतत सरपटत राहातील.तुझ्यासारखे अनेकजण तिथे अशा नरकयातना भोगत आहेत."
" तिथे स्नानसंध्येची तरी काही व्यवस्था असेल ना?"
"स्नानसंध्या? हा ! हा! हा! सकाळी आंघोळ,पूजा-अर्चा आटोपून कपाळावर गंधाचे किंवा कुंकुमाचे टिळे लावून वरवर शुचीर्भूत होऊन पुण्यकृत्य केल्यासारखे दाखवायचे.मग दिवसभर सावजे गाठून पापे करायला मोकळे! नरकात तसले काही नसते.खाणे-पिणे नसते.मरणही नसते. केवळ यातना भोगायच्या.तुझ्या सर्वांगावरून साप सतत फिरणार."
"पण माझ्या देहाचे दहन झाले आहे.शरीरच नाही तर साप अंगावरून कसे सरपटणार?"
"शाबास! थोडे थोडे तुझ्या ध्यानी येत आहे.खरे तर तुझा अजून मृत्यू झालेला नाही.तू मरणासन्न अवस्थेत मृत्युशय्येवर आहेस."
"मेलेलो नाहे? मग चित्रगुप्तासमोर उभा कसा?"
"कुठला चित्रगुप्त? अंतकाळी तुझा तुझ्याशीच चाललेला हा संवाद आहे.तुझी सदसद्विवेकबुद्धी म्हणजे मी, चित्रगुप्त.आयुष्यभरात तू जे काही पापपुण्य केलेस त्याच्या सचित्र नोंदी तुझ्या मेंदूच्या स्मृतिकेंद्रात आहेत.तीच माझी चोपडी.तू काय काय केलेस ते सगळे कुणा त्रयस्थाला कसे कळणार? आता मेंदूतील ती जीवनचित्रपटदृश्ये तुझ्या डोळ्यांपुढून वेगाने सरकत आहेत.भोळसट श्रद्धाळूंना लुबाडून तू पाप केले आहेस.त्याचे फळ म्हणून तुला नरकयातना भोगाव्या लागणार असे तुला मी,म्हणजे तुझी सदसद्विवेकबुद्धीच सांगत आहे."
"मी असे करायला नको होते.शिक्षकाची नोकरी होती.त्यात कुटुंबाचे भागले असते."
"हे तुझ्या बुद्धीला त्यावेळीही समजत होते.पण लोभ,मोह अशा मनोविकारांनी बुद्धीवर मात केली.पुढे या धंद्यात विनायास खूप प्राप्‍ती होऊ लागली.पैसा वाढल्यावर विषयोपभोग,रंगढंग सुचू लागले.अंतर्मनात टोचणी लागली होती.तिच्या शमनार्थ तीर्थयात्रा,जपजाप्य,सत्यनारायण व्रत असे उपाय केले. ते सगळे निरर्थक आहे हे बुद्धीला कळत होते पण भावनेला वळत नव्हते.अंतकाळी सगळे आठवलेच."
"मी अजून जिवंत आहे तर!"
"मनात तोच विचार चालला आहे वाटते ! जगण्याची आशा तुटत नाही का? पण आता मरण अटळ आहे. अगदी जवळ आले आहे.म्हणून आपले निधन झाले,अंत्यसंस्कार झाले असे भासले.आता नरकयातना भोगाव्या लागणार याची जाणीव झाली."
"मृत्यूनंतर नरकवास नसतो का?"
"मृत्यूनंतर काहीच नसते.हे पटवून देण्याचा मी अनेकदा प्रयत्‍न केला.पण उपयोग झाला नाही.प्रत्येक वेळी भावनेने बुद्धीवर मात केली. नरकातील यातना तसेच स्वर्गातील सुखे या गोष्टी मानसिक पातळीवर भोगायच्या असतात.आयुष्यातील सर्व घटनांचा पट मृत्यूपूर्वी काही काळ विद्युत् वेगाने दृष्टिपटलावरून सरकत असतो. ज्यांनी सत्कृत्ये केलेली असतात त्यांना सुख, समाधान, कृतकृत्यता वाटते.तसे आयुष्यभर त्यांना सुखसमाधान लाभतच असते.तेच स्वर्गसुख.
ज्यांनी दुष्कृत्ये केलेली असतात त्यांना ती आठवून मानसिक यातना होतात. हा नरकवास म्हणायचा. खरे तर हे अगदी अल्पकाळ असले तरी आपण वर्षांनुवर्षे नरकवास भोगतो आहोत असे वाटते.काळ सापेक्ष असतो.तसेच केल्या पापाचे शल्य नेणिवेच्या पातळीवर आयुषभर टोचतच असते."
"मग मी आता काय करू?"
"आता तुझ्याहाती काही नाही.
श्वासोच्छ्वास थांबेपर्यंत शारीरिक आणि मानसिक पातळीवर जे घडत राहील ते सोसायचे. दुसरे काय?"
.......................................................................................प्रा..ना.वालावलकर ynwala@gmail.com

कोई टिप्पणी नहीं: